भोकर : (रमेश गंगासागरे)  मागील वर्षीचा जप्त करण्यात आलेला विविध कंपनीचा गुटखा आज मी कोर्टाच्या आदेशाने नष्ट करत असून आज भोकर शहरात कुठेच धाड टाकून गुटखा पकडण्याचा कार्यक्रम नसल्याचे वक्तव्य नांदेड येथील अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी श्री जिंतुरकर यांनी अवैद्य गुटखा विक्री चालू असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केले, ते भोकर येथे जप्त करण्यात आलेला गुटखा नष्ट करण्यासाठी आले होते.
        नष्ट करण्यात येत असलेल्या या गुटख्याबाबत जिंतुरकर यांनी दिलेली माहिती अशी की, भोकर शहरात  सन 2018 मध्ये भोकर पोलिसांनी शासनाने बंदी घातलेला सितार, पेट्रोल, आरएमडी या गुटख्याची वाहतूक करणारे दोन वाहने पकडून आरोपी शेख मोईन शेख बाबू शशांक आणि गणेश आडे यांच्या ताब्यातून अनुक्रमे 1 लाख 76 हजार 340 आणि 60 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता,  हा गुटखा बऱ्याच दिवसापासून भोकर पोलीस ठाण्यात तसाच पडून होता, आता हा गुटखा नष्ट करण्यासंदर्भात कोर्टाचे आदेश प्राप्त झाल्याने आज दिनांक 23 जानेवारी रोजी पंचासमक्ष नष्ट करण्यात येत असल्याची माहिती जिन्तुरकर यांनी दिली,  दरम्यान जिंतूरकर हे भोकर शहरात दाखल झाल्याची माहिती अवैद्य गुटखा विक्रेत्यांना लागताच त्यांच्यात एकच धावपळ उडाली होती, ही बाब शहरातील काही पत्रकारांना माहीत झाल्यानंतर त्यांनी जिंतुरकर यांना आज शहरातील गुटखा विक्रेत्यांना पकडणार का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी वरील उद्गार काढले, त्यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यानी  सुटकेचा श्वास सोडला,  जिन्तुरकर पुढे बोलताना म्हणाले की, मला नांदेड जिल्ह्यातील 6  तालुके आहेत,  आमच्या नांदेड कार्यालयात मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे कुठेच तात्काळ कार्यवाही करणे शक्य नाही, एकटा माणूस कुठे कुठे जाणार, असे म्हणून त्यांनी पत्रकारांपुढे वेळ मारून नेली, दरम्यान भोकर ठाण्यात  दीपावलीच्या कालखंडात जप्त करण्यात आलेला लाखो रुपयांचा गुटखा तसाच पडून असल्याचे कळते. जिन्तुरकर भोकरला आले अन् कोणतीच नवीन कारवाई न करता निघून गेल्याने आज भोकर शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. जिन्तुरकर यांच्यासोबत नांदेड हुन आलेले अमरसींग राठोड, भोकरचे पोलिस जमादार जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण आणि पंच यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हा गुटखा उमरी रोड वरील कैलास टेकडीलगत जाळून नष्ट करण्यात आला.