भोकर :- (रमेश गंगासागरे) आपला मुलगा जर डॉक्टर, इंजिनिअर, वकील, किंवा शिकून सवरून मोठा अधिकारी व्हावा असे वाटत असेल तर प्रथम आई वडिलांनी घरातील इडियट बॉक्स म्हणजेच टिव्हीचा काही दिवस त्याग करावा, आणि १२ वीच्या नंतरच मुलांना मोबाईलचा वापर करू द्यावे, तरच मुलांची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय सावंतसर यांनी गुरुवार दि, २७ रोजी शाहू विद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात केले.
पालक मेळाव्यात सावंतसर पुढे बोलतांना म्हणाले की, मुलगा, मुलगी १० वी, १२ वीला आहे याचे भान ठेवावे,असंख्य घरातील पालक टीव्हीवर आपल्या आवडीचे सिरीयल विद्यार्थी अभ्यासाला बसलाकीच पहात असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे, दरवर्षी टीव्हीवर क्रिकेट, आयपीएल हे ऐन मुलांच्या परिक्षेच्याच वेळी असते, त्यामुळे मुलांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे, क्रिकेट चालू असल्याने मुले टिव्ही कडे आकर्षिले जात आहेत, हा टीव्ही म्हणजेच इडियट बॉक्स काही दिवस जर त्याग करून पालकांनी गुंडाळून ठेवला तर आपण मुलांमध्ये पहात असलेली स्वप्ने पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही, तसेच असे ते म्हणाले. यावेळी पत्रकार रमेश गंगासागरे यांच्यासह अभय तुपतेवार, आणि महिला पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तसेच आयोजकांनी विद्यार्थ्यांना सुध्दा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी वेळ दिला होता, तेंव्हा असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या, पालक मेळाव्यास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments