भोकर : (रमेश गंगासागरे) 'वजीर' हा दुसरा तिसरा कोनी नसून हा एक गुटखा आहे, आजपर्यंत आपण विविध नावाने बाजारात आलेला गुटखा बघितला असेल पण आता कायद्याने बंदी असतानाही शहर व तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून मोठ्यादिमाखाने गुटख्याची सर्रासपणे विक्री होतांना दिसून येत आहे, हा गुटखा खाऊन तरुण पिढी व अल्पवयीन मुले स्वताचे आयुष्य बरबाद करून घेताना दिसून येत आहेत.
      मागील सहा महिन्यांपासून शहरातील प्रत्येक पाणठेल्यावर "वजीर" नावाचा गुटखा खायला आणि पहायला मिळत असल्याने गुटखा बंदीतून भोकर तालुक्याला वगळण्यात आले की काय, या चर्चेला उधाण आले आहे, हा गुटखा शहरात असलेल्या सरकारी कार्यालय, शाळा आणि महाविद्यालया लगत असलेल्या पांनठेल्यावर अगदी सहजतेने कोणत्याही वयोगटातील मुले आणि पुरुषांना मिळत आहे, त्यामुळे अगदी अल्पदरात तोंडाचा कॅन्सर अन्न व औषधी प्रशाषणाच्या आशीर्वादाने आणि गुटखा माफियांच्या आशीर्वादाने तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध होत आहे, तालुक्यातील भोसी, मोघाळी, किनी, पाळज, पांडुरणा, रिठा, लगळुद,पिंपळढव, सोनारी,रेणापूर, बटाळा या गावांना मोटारसायकलवरून वाहतूक करून दररोजच्या दररोज गुटखा कमी पडू न देण्याचे काम भोकर येथील काही होलसेल दुकानदार नित्य नियमाने शुभ कार्य पारपाडत आहेत, तालुक्यात अशी परिस्थिती असतांनाही नांदेड येथुन जिल्ह्याचा कार्यभार सांभाळणाऱ्या अन्न व औषधी प्रशाषणाने त्यांच्यावर कारवाई करून त्यास चेक मेट करण्या ऐवजी आजपर्यंत कोणतीही कठोर कार्यवाही केली नाही, उलट गुटखा माफियांना तालुका मोकळा सोडून त्यांच्या कार्याकडे कानाडोळा केल्याने उपहासात्मक म्हणून 'वजीर' नावाच्या गुटख्याने अधिकाऱ्यानाच "चेक मेट" करून बाजारात प्रवेश केला असल्याची चर्चा चौका चौकातील पान ठेल्यावर रंगत आहे.